हिंदुस्थानी वंशाच्या जोहरान ममदानी यांचा महापौर निवडणुकीत जलवा, मतदारांना उद्देशून मारला डायलॉग खूप गाजतोय

‘तुमने कभी किसी को वोट दिया… कभी किसी को फ्रँक किया…’ बॉलिवूड सिनेमातील हे डायलॉग मारत निवडणुकीचा प्रचार करणारे भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी अमेरिकेच्या राजकारणात धमाल उडवून दिली आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत ते ‘डार्क हॉर्स’ ठरले. ममदानी यांनी डेमोव्रॅटिक पक्षाचे वजनदार नेते अँड कोमो यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता ते डेमोव्रॅटिक पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार ठरले असून या पदापासून केवळ एक पाऊल दूर आहेत.

समाजवादी विचारसरणीचे 33 वर्षीय जोहरान ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर व मार्क्सवादी विचारवंत मेहमूद ममदानी यांचे चिरंजीव आहेत. ते अमेरिकेतील डेमोव्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या उमेदवारीवर दावा केला होता. अँड कोमो यांच्याशी त्यांची लढत झाली. निवडणुकीचा प्रचार करताना जोहरान यांनी बॉलिवूडच्या सिनेमातील डायलॉग व अभिनेत्यांच्या स्टाइलचा आधार घेतला होता. तुमने कभी किसी को वोट किया… मेरे पास पैसा है, गाडी है, बंगला है… तुम्हारे पास क्या है? मेरे पास आप हो… अशी साद मतदारांना घालणारे त्यांचे व्हिडिओ जगभर व्हायरल झाले. या आगळ्यावेगळ्या प्रचाराने त्यांनी मतदारांची मने जिंकली आणि निकालात आघाडी घेतली.ममदानी यांना डेमॉव्रॅट पक्षातील पुरोगामी नेत्यांचा भक्कम पाठिंबा होता.

आपण इतिहास घडवलाय!

‘आज आपण इतिहास घडवलाय. नेल्सन मंडेला यांच्या शब्दांत सांगायचं तर जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते. पण मित्रांनो, आपण करून दाखवलं. आपण सगळे जिंकलोय. मी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून तुमचा महापौरपदाचा उमेदवार असेन,’ अशा भावना जोहरान ममदानी यांनी विजयानंतर व्यक्त केला. प्रतिस्पर्धी उमेदवार अँड कोमो यांचे त्यांनी आभार मानले.

जोहरान माथेफिरू साम्यवादी – ट्रम्प

जोहरान ममदानी यांच्या विजयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड निराशा झाली. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्यावर प्रतिक्रिया दिली. जोहरान यांच्यावर ट्रम्प यांनी व्यक्तिगत टीका केली. ‘जोहरान भयानक दिसतो. त्याचा आवाज भसाडा आहे. तो फारसा हुशार नाही, असे ट्रम्प म्हणाले. जोहरान यांना पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी व डेमॉक्रॅट पक्षावरही त्यांनी बोचरी टीका केली. ‘शेवटी ते घडलंच! डेमॉव्रॅट पक्षाने सीमारेषा ओलांडली. जोहरान ममदानी हा शंभर टक्के माथेफिरू डावा आहे. आता तो महापौर बनायला निघालाय. आपल्याकडं कट्टर डावे आधीही होते, पण आता परिस्थिती जास्तच किळसवाणी झालीय,’ असे ट्रम्प म्हणाले.