हर हर महादेवच्या गजरात अमरनाथ यात्रा सुरू! जम्मूहून यात्रेकरुंचा पहिला जत्था रवाना

अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो भाविक पवित्र अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी खडतर प्रवास करून जातात. जम्मूहुन आता या यात्रेला जाण्यासाठीचा यात्रेकरुंचा पहिला गट रवाना झालेला आहे. उपनिरीक्षक मनोज सिन्हा यांनी 146 वाहनांमधून जम्मूहून श्रीनगरला अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिला गट रवाना केला आहे.

जम्मूतील भगवती नगर येथील श्री अमरनाथ यात्री निवास बेस कॅम्प येथून कडक सुरक्षेत यात्रेकरूंचा हा गट श्रीनगरला रवाना झाला आहे. भोलेनाथच्या भक्तांची वर्षभराची प्रतीक्षा संपली आहे. यावर्षीची अमरनाथ यात्रा औपचारिकपणे ३ जुलैपासून सुरू होणार आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट अमरनाथ यात्रेवर घोंघावत होते. त्यामुळेच भक्त येतील की नाही अशी आशंका निर्माण झाली होती. परंतु पहिल्याच गटातील यात्रेकरुंनी मात्र ही यात्रा या दहशतवादाला योग्य उत्तर आहे असे म्हटले आहे.

अमरनाथ यात्रेबद्दल भोलेच्या भक्तांमध्ये खूप उत्साह आहे. या गटात समाविष्ट असलेल्या भाविकांनी दावा केला की यावेळी यात्रा दहशतवादाला योग्य उत्तर आहे. शिवभक्तांनी सांगितले की, यावेळी दहशतवादावर श्रद्धेचा विजय होईल.

यात्रेत सहभागी भाविकांनी सांगितले की आमच्यासाठी श्रद्धा ही दहशतीपेक्षा मोठी आहे, म्हणूनच आम्ही अमरनाथ यात्रेला येत आहोत आणि बाबा बर्फानीचे दर्शन घेणार आहोत. आम्हाला आमच्या सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे. श्री अमरनाथ जी यात्रेसाठी भाविक ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’ असा जयघोष करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-४४) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच, प्रत्येक छोट्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ३ जुलैपासून सुरु होणारी यात्रा ही 39 दिवस चालणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे.