
काही दिवसांपूर्वी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमधील एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घडना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी, झैद अहमद आणि कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. 25 जून रोजी झालेल्या या क्रूरकृत्या विरोधात पोलिसांकडे देखील असंख्य पुरावे आहेत.
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत पीडितेने मोठी माहिती दिली. पीडितेने पोलिसांना सांगितले की, बलात्कारापूर्वी तिला पॅनिक अटॅक आला होता. त्यानंतर तिला इनहेलर देण्यात आले होते, असे तिने पोलिसांना सांगितले होते. ‘मला काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय येत होता. त्यामुळे मी खूप घाबरले आणि मला पॅनिक अटॅक आला. याच वेळी मुख्य आरोपी मनोजित मिश्राने त्याच्या साथीदारांना इनहेलर आणण्यास सांगितले. इनहेलर आणल्यानंतर ते मला देण्यात आले. ज्यामुळे मला थोडा आराम मिळाला. बरे वाटल्यानंतर, मी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कॉलेजचे मुख्य गेट बंद होते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद
पीडितेच्या म्हणण्यानुसार, परिस्थितीचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी तिला गार्ड रूममध्ये ओढले. जिथे त्यांनी सामूहिक बलात्कार केला. मनोजित मिश्रा पीडितेवर बलात्कार करत होता, तर इतर दोन आरोपी प्रमित मुखर्जी आणि झैद अहमद संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेला जबरदस्तीने नेत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनीही स्पष्ट केले आहे.
मी वारंवार नकार दिला, भांडले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी खूप रडत होते. मला जाऊ द्या प्लीज, असे म्हणत त्यांच्या पाया पडले. पण त्याने माझे ऐकले नाही. त्याने माझ्यावर बळजबरी केली. मला पॅनिक अटॅक आला म्हणून मी त्याला मला रुग्णालयात घेऊन जाण्यास किंवा माझ्यासाठी इनहेलर आणण्यास सांगितले. इनहेलर घेतल्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मग तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण कॉलेजचे मुख्य गेट बंद होते आणि गार्ड देखील मला मदत करू शकला नाही, असे पीडिता म्हणाली.


























































