
विक्रोळी पूर्व कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्यामुळे रहिवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वाहिन्या पालिकेकडे वर्ग करा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत केली.
विक्रोळीतील या जल-मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. मात्र त्यांच्या दुरुस्ती-देखभालीकडे म्हाडाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत म्हाडाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करून आणि बैठका घेऊन पाठपुरावा केला गेला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या जल-मलनिस्सारण वाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छ पाणी आणि दुर्गंधी-अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या जल-मलनिस्सारण वाहिन्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपवावी, असे राऊत म्हणाले.