मुंबईचा विषय आहे, मराठी माणसाचा विषय आहे… लवकर संपणार नाही! तालिका अध्यक्षांसमोर आदित्य ठाकरे यांचा मराठी बाणा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मराठी बाणा गुरुवारी विधानसभेने पाहिला. कोळी बांधवांच्या मुद्दय़ावर बोलण्यासाठी आदित्य ठाकरे उभे राहिले असता तालिका अध्यक्षांनी थोडं लवकर संपवा, असे सांगितले. पण लवकर संपणार नाही, मुंबईचा विषय आहे… मराठी माणसाचा विषय आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी तो मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडला.

ससून डॉकमधील कोळी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा हा मुद्दा होता. आदित्य ठाकरे म्हणाले की, ससून डॉकमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे. तिथे महाराष्ट्र मच्छीमार विकास महामंडळाने (एमएफडीसी) भाडय़ाने जागा घेतली आहे आणि ती हजारो कोळी बांधवांना मासेविक्री, पॅकेजिंग, एक्सपोर्ट यासाठी दिली आहे. त्याचे शुल्क त्यांच्याकडून घेतले जाते.

दहा वर्षांपूर्वी न्यायालयाचा एक निर्णय आला होता. एमएफडीसी भाडे देत नसल्याने ससून डॉकमधील कोळी बांधवांना हटवा असे त्या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्टने सांगितले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या वेळी बैठक घेतल्याने विषय थांबला होता. पण पुन्हा एकदा आता ससून डॉकमधील कोळी बांधवांना तसेच फिशरीजचे काम करणाऱ्या लोकांना नोटिसा आल्या आहेत. ते लोक महामंडळाला भाडे देतात. राज्य सरकार व केंद्र सरकारमधील वादात कोळी बांधवांवर अन्याय होत आहे. तातडीने नोंद घेऊन हा वाद मिटवावा व कोळी महिलांवर होणारा अन्याय रोखावा. छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधूनही कोळी बांधवांना निघून जाण्यास मुंबई महापालिकेने सांगितले आहे. मच्छिमारी व्यवसायात लाखो मराठी आणि अमराठी लोक आहेत. मग हा अन्याय नेमका कशासाठी होतोय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.