आमच्या विधायक गुंडगिरीमुळेच तुम्ही सन्मानाने CM च्या खुर्चीवर बसलेले आहात! संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. थोड्याच वेळात हा विजय मेळावा सुरू होईल. हा विजय मेळावा कसा असेल? कार्यक्रमाची रुपरेषा काय? याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

शनिवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठी भाषेसंदर्भातला आजचा हा विजय सोहळा ठरवून केलेला कार्यक्रम नाही. आम्ही संघर्ष केला आणि सरकारने माघार घेतली. आता विराट मोर्चाचे रुपांतर विजय मेळाव्यात होत आहे. पाऊस नसता तर हा मेळावा शिवतीर्थावर केला असता. पण हा मेळावा वरळी डोम येथे होत असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक पोहोचायला सुरुवात झाली आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा अत्यंत स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते, दोन भाऊ यांनी मंचावर एकत्र येऊन मराठी माणसाला, महाराष्ट्राला दिशादर्शन करावे अशी कोट्यवधी मराठी माणसांची भूमिका आहे. साधारण 11.30 वाजता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. भव्य मंच आहे. हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरुवातीला राज्यगीत वाजवले जाईल आणि त्यानंतर वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या बँड पथकाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन होईल, असे राऊत यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मंचावर एकत्रित आमंत्रित केले जाईल आणि ते महाराष्ट्राला संबोधित करतील. कार्यक्रम आटोपशीर आणि सुटसुटीत आहे. सभागृहाच्या बाहेर सुद्धा मोठ्या स्क्रीन लावून बाहेर जमलेल्या गर्दीला हा सोहळा पाहता यावा यासाठीसुद्धा व्यवस्था केलेली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली त्या संघर्षाचा अभ्यास फडणवीस यांनी करणे गरजेचे आहे. आज जे फडणवीस ताठ मान करुन बोलताहेत त्याच्या मागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरीमुळेच फडणवीस सन्मानाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले आहात, असे राऊत यांनी सुनावले.

शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही, प्रसंगी संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले. गुन्हे दाखल केले. बेळगावमध्ये आम्ही गेलो, तुम्ही नाही गेलात. आमच्यावर खटले दाखल झाले. मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत. तेव्हा फडणवीस यांनी या विषयावर कमीत कमी भाष्य करावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.