खासगी सावकाराचा जाच; व्यापाऱ्याने जीवन संपवलं

बीड शहरातील पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानांची सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बीड शहरातील पेठ बीड भागात काळा हनुमान ठाण्यामध्ये वास्तव्यास असलेले छोटे व्यापारी रामा फटाले यांनी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. बीडच्या बिंदुसरा पुलानजीक त्यांचे कपड्याचे दुकान होते. दुकानासाठीच ते कर्ज घेतले होते. कर्ज घेताना चेक दिले होते. खासगी व्यापाऱ्याचे घेतलेले कर्ज फेडूनही सावकार दिलेले चेक परत देत नव्हता.
तगादा लावल्यानंतर व्यापाऱ्याच्या नावावर दिलेला चेक परत दिला मात्र व्यापाऱ्याच्या पत्नीच्या नावावर दिलेला चेक परत करण्यास नकार देत होता आणि अजून पैशांसाठी तगादा लावत होता. या सावकाराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी सहा पानांची सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.