
80 च्या दशकात मुंबईतून नवी मुंबईत आलेले एपीएमसी मार्केट आता नवी मुंबईच्याही बाहेर जाणार आहे. एमएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रोथ हब नियामक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत मार्केटच्या स्थलांतराबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मार्केटचे स्थलांतर करताना ते सध्याच्या मार्केटपासून 25 kilometers परीघात करावे. कमीत कमी 500 एकरचा भूखंड असावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडात सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखले जाते. या मार्केटसाठी सिडकोने 172 एकरचा भूखंड 80 च्या दशकात एपीएमसीला दिला होता. त्यापैकी 150 एकरवर कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला, मसाला आणि धान्य मार्केट उभे राहिले आहे, तर उरलेल्या 22 एकरवर कोल्ड स्टोरेज आणि मध्यवर्ती सुविधा इमारती बांधण्यात आल्या आहेत.
मार्केटसाठी ही जागा कमी पडत असल्याने नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. तशा सूचना ग्रोथ हब नियामक मंडळाच्या बैठकीत नवी मुंबई महापालिका आणि सिडकोला देण्यात आल्या आहेत. मार्केटच्या स्थलांतराचे वारे वाहू लागल्यामुळे माथाडी कामगार, व्यापारी आणि मार्केटमध्ये काम करणाऱ्या अन्य घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या स्थलांतराबाबत या मार्केटच्या पाचही बाजारातील व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जर जागा 25 किमीच्या अंतरात मिळाली तर व्यापाऱ्यांनी स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शासनाने जागा उपलब्ध करून दिली तर मार्केटच्या स्थलांतरात कोणतीही अडचण राहणार नाही, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे सभापती प्रभू पाटील यांनी व्यक्त केली आहे.