
कल्याण, डोंबिवलीतून पनवेलसाठी सुटणारी एसटी सेवा गेल्या चार वर्षांपासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीला अवाचे सवा भाडे देऊन प्रवास करावा लागत होता. कोरोना काळापासून बंद असलेली ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या मार्गावर लालपरी धावणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कल्याण, डोंबिलीतून दररोज लाखो प्रवासी पनवेलच्या दिशेने प्रवास करतात. मात्र कोरोना काळात डोंबिवली-पनवेल आणि कल्याण-पनवेल ही बस सेवा बंद ठेवली होती. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सर्व सेवा सुरू करण्यात आल्या. परंतु कल्याण, डोंबिवलीहून पनवेलच्या दिशेने सुटणारी ही सेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. चार वर्षांपासून ही सेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी एसटी महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला. याला यश आले असून डोंबिवली-पनवेल आणि कल्याण- पनवेल या मार्गावरील एसटी लवकरच सुरू करणार असल्याची लेखी माहिती पनवेल आगार प्रशासनाकडून देण्यात आली.