
गुरांच्या गोठ्यात नियमित येऊन बसणाऱ्या बिबट्याची चिपळूण ओवळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पळवून लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला मात्र बिबट्या गोठ्यातच येऊन बसत होता. अखेर वनविभागाने गोठ्यातच पिंजरा लावून बिबट्याला पकडले.
चिपळूण तालुक्यातील ओवळी गावातील विलास मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या येऊन बसत होता. बिबट्याला तिथून पळवून लावण्यासाठी अनेक उपाय केले मात्र वातावरण शांत झाले की बिबट्या पुन्हा गोठ्यात येऊन बसत होता. त्यामुळे वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले तसेच एक पिंजरा ठेऊन त्यात भक्ष्य ठेवले. नेहमीप्रमाणे बिबट्या आला मात्र त्याने पिंजऱ्यातील भक्ष्याकडे पाहिले नाही तो बिबट्या सरळ गोठ्यात येऊन बसला. त्यानंतर वनविभागाने गोठ्यात पिंजरा लावून त्यामध्ये भक्ष्य ठेवले. यावेळी मात्र गोठ्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. हा बिबट्या नर असून 4 ते 5 वर्षांचा आहे. त्याच्या मानेवर जखमा आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पुढील उपचारांसाठी रेस्क्यू ट्रांसीट ट्रिटमेंट सेंटर पुणे येथे पाठवले आहे.
































































