आघाडी कुणाची? आज थराराची कसोटी, लॉर्ड्स कसोटी रोमहर्षक वळणावर! विजयाची दोघांना समान संधी; हिंदुस्थानला हव्यात 135 धावा, तर इंग्लंडला 6 विकेट

ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी क्रिकेट सामना आता रोमहर्षक वळणावर पोहाचलाय. हिंदुस्थानी गोलंदाजांनी चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 62.1 षटकांत अवघ्या 192 धावांत गुंडाळण्याचा करिश्मा केला. मोहम्मद सिराज व नितीश कुमार रेड्डी या वेगवान जोडगोळीने इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला सुरुंग लावला. त्यानंतर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने मधल्या फळीला भगदाड पाडले, तर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने शेपटाला फार वळवळू दिले नाही. शेवटी सुंदरनेच शोएब बशीरचा त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव संपविला. प्रत्युत्तादाखल हिंदुस्थानची उर्वरित 17.4 षटकांच्या खेळात 4 बाद 58 अशी दुर्दशा करीत इंग्लंडने लढतीत जोरदार पुनरागमन केले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर के. एल. राहुल 33 धावांवर खेळत होता. आता पाचव्या व अखेरच्या दिवशी हिंदुस्थानला विजयासाठी 135 धावांची गरज असून, इंग्लंडला 6 बळी हवे आहेत.

इंग्लिश गोलंदाजांचा तिखट मारा

इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर रोखणाऱ्या हिंदुस्थानचा हा आनंद औटघटकेचा ठरला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिखट मारा करीत हिंदुस्थानची आघाडीची फळी कापून काढली. जोफ्रा आर्चरने दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालला भोपळाही फोडू न देता यष्टीमागे स्मिथकरवी झेलबाद करून इंग्लंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग बायडन कार्सेने करुण नायर (14) आणि कर्णधार शुभमन गिल  (6) यांना लागोपाठच्या षटकात बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्याने या दोघांनाही पायचीत पकडले. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेल्या आकाश दीपचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला चौथा धक्का देत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकविला.

लॉर्ड्सवर सिराजचे तुफान

दरम्यान, तिसऱ्या दिवशी अखेरच्या क्षणी टाईमपास करून रडीचा डाव खेळल्याने हिंदुस्थानी खेळाडू चांगलेच भडकले होते. त्यामुळे रविवारी चौथ्या दिवशी इंग्लंडने बिनबाद 2 धावांवरून पुढे खेळ सुरू केल्यानंतर लॉर्ड्सवर हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांचे तुफान बघायला मिळाले. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात बेन डकेटला (12 धावा) मिड ऑनला बुमराकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. यावेळी सिराजचा अतिआक्रमक जल्लोष बघण्यासारखा होता. मग याच सिराजने आलेल्या ओली पोपला (4 धावा) पायचीत पकडून इंग्लंडला दुसरा धक्का दिला, मात्र हिंदुस्थानला हा बळी रिह्यूच्या आधारे मिळवावा लागला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉऊलीला (22) जैस्वालकरवी झेलबाद करून इंग्लंडची 14.4 षटकांत 3 बाद 50 अशी दुर्दशा केली. त्यानंतर आकाश दीपने रॉकेट यॉर्परवर हॅरी ब्रूकचे मधले दांडके उखडून हिंदुस्थानला बहुमोल बळी मिळवून दिला.

वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी

वेगवान गोलंदाजीचा खुबीने वापर केल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने रवींद्र जाडेजा व वॉशिंग्टन सुंदर ही फिरकीची जोडगोळी मोर्चावर आणली. त्यात वॉशिंग्टनने अतिशय सुंदर गोलंदाजी करीत धोकादायक जो रूट (40), नव्या दमाचा जेमी स्मिथ (8) व कर्णधार बेन टोक्स (33) या तीन फलंदाजांचे त्रिफळे उडवून इंग्लंडच्या पोटात गोळा आणला. मग जसप्रीत बुमराने ब्रायडन कार्से (1) व ख्रिस वोक्स (10) यांना खोलवर यॉर्परवर दांडके उडवून इंग्लंडचे शेपटू वळवळणार नाही याची काळजी घेतली. शेवटी वॉशिंग्टनने शोएब बशीरचा त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव संपविला. हिंदुस्थानकडून वॉशिंग्टनने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमरा यांनी 2-2 गडी बाद केले, तर नितीश कुमार रेड्डी व आकाश दीप यांना 1-1 बळी मिळाला.