
>>संजय कऱ्हाडे
लॉर्ड्सचा कसोटी सामना जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली ती तिसऱ्या संध्याकाळी. दोन्ही संघांचा समान धावसंख्येवर खात्मा झाला आणि केवळ दोन षटपं खेळण्यासाठी इंग्लंडला मैदानावर उतरावं लागलं. वेळ घालवण्याचा क्राऊलीचा प्रयत्न यशस्वी झाला आणि कप्तान गिलसहित सर्वच हिंदुस्थानी खेळाडूंना दोन्ही इंग्लिश सलामीवीरांचे बरेच अवयव आठवले. पण ती खेचाखेची आपण हरलो. शनिवारी सकाळी मात्र डकेट, क्राऊली, पोप आणि ब्रूकला बाद करून हिंदुस्थानने यशस्वीपणे रस्सी आपल्याकडे खेचली. इंग्लंड 4 बाद 87. ब्रूकने आकाशदीपला एका षटकात ऋषभ स्टाईलने दोन चौकार आणि एक षटकार खेचला तेव्हा पुन्हा एकदा ‘बॅझबॉल’चं भूत अवतरत असल्याची शंका आली. पण आपला लेग स्टंप उघडा ठेवून स्वीप करण्याच्या नादात ब्रूक बाद झाला.
त्यानंतर रूटने आपली पाळंमुळं रोवली आणि स्टोक्सच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान मात्र रस्सीखेचीत इंग्लंडने सरशी मारली. पण ब्रूकप्रमाणेच लेग स्टंप उघडून स्वीप करण्याच्या नादात रूट बाद झाला. पाठोपाठ जेमी स्मिथ आणि स्टोक्सही बाद झाला आणि पुन्हा एकदा हिंदुस्थानने रस्सी आपल्याकडे ओढली! इंग्लंड 7 बाद 181. यानंतर मात्र रस्सी खेचण्याचं बळ इंग्लंडकडे नव्हतं.
थोडं आपल्या गोलंदाजांबद्दल! पहिल्या डावात पाच बळी मिळवणारा बुमरा कार्सला यॉर्कर टाकेपर्यंत यशस्वी नाही झाला. मात्र त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. अर्थात, त्याचा टप्पा आणि दिशा सिराजने कायम राखणं आवश्यक होतं. पण अतिउत्साहाचा तो बळी ठरला. त्याच्या आक्रस्ताळी उत्साहामुळे विनाकारण बाईज धावा गेल्या आणि इंग्लंडची धावसंख्या किमान पंचवीस धावांनी वाढली.
वॉशिंग्टन सुंदरचा उल्लेख मात्र मोठय़ा गौरवाने करावा लागेल. त्याने रूट, स्टोक्स आणि स्मिथचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. तिघांनाही त्रिफळाचित करणाऱ्या वॉशिंग्टनचा आपल्या विजयात फार महत्त्वाचा वाटा असेल.
आता हा सामना पुन्हा एकदा रोमहर्षक करण्याची कुणाला लहर आली नाही तर मात्र विजयश्री आपलीच!