
मध्य रेल्वेमध्ये हिंदी राजभाषा विभागाच्या धर्तीवर ‘अभिजात मराठी भाषा विभाग’ स्थापन करा आणि मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे. याबाबत शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई आणि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मध्य रेल्वे प्रशासनामध्ये मराठी भाषेचा मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, त्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यासाठी स्वतंत्रपणे ‘अभिजात मराठी भाषा विभाग’ स्थापन करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या प्रमुख मागणीसह रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांकडे महाव्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले. रेल्वे रनिंग स्टाफच्या लाल सिग्नल पास करण्यासंबंधी कठोर शिक्षा कमी कराव्यात, लेसिक ऑपरेशन (डोळय़ांची शस्त्रक्रिया) केलेल्या कर्मचाऱ्यांना ए-1 आणि ए-2 मध्ये वैद्यकीयदृष्टया फिट करावे, ऑनलाईन रनिंग स्टाफसाठी शौचालय सुविधेचे योग्य नियोजन करावे, तसेच महिला रनिंग स्टाफच्या समस्या सोडवाव्यात आदी मागण्यांबाबत महाव्यवस्थापकांना लेखी निवेदन देण्यात आले. शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी व सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली.
महाव्यवस्थापकांच्या भेटीदरम्यान रेल कामगार सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर, संयुक्त सरचिटणीस नरेश बुरघाटे, अर्जुन जामखिंडीकर, जनार्दन देशपांडे, किशोर सोनवणे, मुंबई विभाग अध्यक्ष चंद्रकांत विणरकर, सचिव तुकाराम कोरडे, योगेश जाधव, नरेंद्र तळेकर, ट्रफिक ब्रँचचे सचिव संतोष देवळेकर, संदीप गिमवणेकर, अमोघ निमसूडकर, कृष्णा रनशूर, महिला आघाडीच्या सुषमा गुजर, मंजुषा माटे, प्रभा गुप्ता आदींचा समावेश होता.