
नाशिक जिल्ह्यातील नाशिक-वणी मार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दुचाकी आणि चारचाकीत समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या नाल्यामध्ये कोसळली. यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वर्षाच्या बाळासह तीन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील एक कुटुंब मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाशिक येथे आले होते. वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना रात्री एकच्या सुमारास गाडीचा अपघात झाला. दुचाकीला धडकल्यानंतर कार रस्त्याच्या जवळील नाल्यामध्ये पडला. अपघातानंतर कारचे दरवाजा लॉक झाल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
देविदास पंडित गांगुर्डे (वय – 28), मनीषा देविदास गांगुर्डे (वय – 23), उत्तम एकनाथ जाधव (वय – 42), अलका उत्तम जाधव (वय – 38), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय – 45), अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय – 40) आणि भावेश देविदास गांगुर्डे (वय – 2) अशी मृतांची नावे आहेत. तर मंगेश यशवंद कुरघडे (वय – 25) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय – 1 वर्ष) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.