राष्ट्रवादीची सर्वोच्च सुनावणी 22 जुलैला

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घडय़ाळ’ चिन्हाची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. 22 जुलै रोजी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि ‘घडय़ाळ’ चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने 22 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. शिवसेनेच्या पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढेच ही सुनावणी होणार आहे.

अंतरिम आदेश की अंतिम सुनावणी?

अजित पवार गटाने विधानसभा निवडणूक ‘घडय़ाळ’ चिन्हावर लढवली होती. तथापि, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा मुद्दा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उपस्थित केला होता. त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाला जाहिरातींमध्ये ‘घडय़ाळ’ चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ असा स्पष्ट उल्लेख करण्याचे अंतरिम आदेश दिले होते.