मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास राजापूर जवळील पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अथवा पोलीस यंत्रणा वेळेच न पोहोचल्याने येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरुन सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल वाहून नेणारा सदर टँकर राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली. हवेत धुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहून मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक थांबवून ती दुसऱ्या एकेरी मार्गावरुन वळवली.

दरम्यान, टँकरच्या टायरनीही पेट घेतला असून हवेत धुराचे लोट उसळले आहेत. मात्र एक तासाहून अधिक काळ लोटला तरी ही आग अटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने कोणतीच हालचाल न केल्याने व अग्नीशमन यंत्रणाही न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.