
>> दुर्गेश आखाडे
संपूर्ण जिल्ह्याला विकासकामासाठी निधी वितरित करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. कार्यालयात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. दररोज लेखाधिकाऱ्यांच्या दालनात तीन-चार बादल्या लावाव्या लागत आहेत. छप्पर फाडके निधी देणाऱ्यांचे आभाळ फाटलेय अशी अवस्था झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय काही वर्षांपूर्वी नीटनेटके करण्यात आले होते. सध्या मात्र या कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. लेखाधिकारी यांच्या दालनातील छप्पराचे पीओपी उद्ध्वस्त झाले आहे. इमारतीला गळती असल्याने पावसाच्या पाण्याच्या धारा लागत आहेत. लेखाधिकाऱ्यांच्या दालनात दररोज तीन-चार बादल्या लावाव्या लागत आहेत. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या दालनाची अवस्थाही बिकट आहे. पाऊस सुरू झाला की पाझर तलावाप्रमाणे त्यांच्या दालनात पाणी पसरते.