
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मंत्र्यांची वादग्रस्त विधाने व वर्तणुकीमुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवा, असे फर्मानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडले आहे. यामुळे विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंना नारळ मिळणार हे नक्की झाले आहे. याशिवाय इतर पाच वादग्रस्त मंत्र्यांबाबत शहा-फडणवीस यांच्यात दिल्लीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमित शहा यांची संसदेत भेट घेऊन त्यांच्यासोबत अर्धा तास खलबते केली. अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटेंच्या उर्मट वागणुकीमुळे सरकारची मोठी बदनामी झाली आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, योगेश कदम, भरत गोगावले यांचे कारनामे महायुतीला अडचणीचे ठरू शकतात. भाजपच्या काही मंत्र्यांची वर्तणूकही त्रासदायक ठरत असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी शहा यांना दिली.
त्यावर अमित शहा यांनी मंत्र्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या कारनाम्यांमुळे सरकार बदनाम होत असेल तर त्याला आवर घाला. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सर्वाधिकार आहेत. कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, झाडून साफसफाई करा. स्वच्छ प्रतिमेचे चेहरेच सरकारात असले पाहिजेत, त्याबाबतीत तडजोड नको, असे सांगत शहा यांनी राज्यातील वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एक प्रकारे हिरवा कंदीलच दिल्लीत झालेल्या बैठकीत दाखविला आहे.
गो अहेडचा संदेश…
एकनाथ शिंदे व अजित पवार सरकारमधून समजा बाहेर पडले तरी आपल्याकडे पुरेशा बहुमताचे जुगाड आहे. त्यामुळे कोणताही दबाव न स्वीकारता बेधकडपणे निर्णय घ्या, गो अहेड, असा संदेशही या बैठकीत शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
कठोर निर्णय घ्यावेच लागतील – फडणवीस
महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदार सातत्याने वादात अडकत आहेत. त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला आहे. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. काहीही केलं तरी चालतं, असा समज निर्माण होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
बांगरना आरोग्यमंत्री व्हायचेय
मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या शक्यतेबाबत जोरदार चर्चा सुरू असताना मिंधे गटातील काही आमदारही गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी तर आपल्याला संधी मिळाल्यास आरोग्यमंत्री व्हायला आवडेल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. माणिकराव हे सगळय़ात चांगले मंत्री आहेत. तो व्हिडीओ क्रॉप केलेला आहे. सध्या असे क्रॉप करून कोणाचेही मुंडके कोणालाही लावतात, असा दावाही त्यांनी केला.
‘माणिक’ मंगळवारी निखळणार
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीआधीच त्यांचा राजीनामा घेऊन कोकाटेंचा पत्ता कट केला जाईल. छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी कोकाटेंबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
हिटलिस्ट
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- दादा भुसे
- योगेश कदम
- नरहरी झिरवळ
- नितेश राणे
- जयकुमार गोरे