देशात ऑनलाईन चोरांचा सुळसुळाट; 2024 मध्ये तब्बल 23,000 कोटी रुपये केले लंपास

डिजिटल पेमेंट करणे सोपे असले तरी डिजिटल चोरांच्या सुळसुळाटामुळे देशातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डिजिटल फसवणूक व सायबर गुन्ह्यांमधून 2024 मध्ये हिंदुस्थानातील नागरिकांना 22,842 कोटींचा फटका बसला आहे.

DataLEADS नावाच्या कंपनीने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये हे नमूद करण्यात आले आहे. I4C (Indian Cybercrime Coordination Centre) या केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे अन्वेषण यंत्रणेने इशारा दिला आहे की, 2025 मध्ये ही रक्कम 1.2 लाख कोटी रुपयांच्या वर जाऊ शकते.

2023 मध्ये 7,465 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती, तर 2022 मध्ये ही रक्कम 2,306 कोटी रुपये इतकी होती. त्यामुळे 2024 मधील फसवणूक 2023 वर्षाच्या तुलनेत जवळपास तीनपट आणि 2022 च्या तुलनेत दहा पट अधिक आहे.

सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली आहे – 2024 मध्ये जवळपास 20 लाख तक्रारी दाखल झाल्या असून, 2023 मध्ये सुमारे 15.6 लाख तक्रारी आणि 2019 च्या तुलनेत हे प्रमाण दहा पट अधिक आहे.

अशा प्रकारची फसवणूक वाढण्यामागची कारणं देखील यात नमूद करण्यात आली आहेत.

या अहवालात म्हटल्यानुसार डिजिटल पेमेंटचा झपाट्याने झालेला प्रसार, विशेषतः Paytm, PhonePe यांसारख्या अॅप्सद्वारे व्यवहार.

WhatsApp, Telegram यांसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर आर्थिक माहिती शेअर करणे.

2025 च्या जूनमध्ये एकट्या महिन्यात 90 कोटी UPI व्यवहार झाले असून त्यांची एकूण रक्कम होती 24.03 लाख कोटी रुपये आहे.

डिजिटल व्यवहाराची एकूण किंमत 2013 मध्ये 162 कोटी रुपयांपासून वाढून जानेवारी 2025 मध्ये 18,120.82 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

कोविडच्या काळात डिजिटल व्यवहारांना चालना दिल्याने ग्रामीण भागातही मोबाईलवर व्यवहार वाढले. मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. बँकिंग, विमा, आरोग्य व बांधकाम व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत.

गुन्हेगार आता एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. डीपफेक व्हिडीओ, आणि खोट्या जाहिरातींसह विश्वासार्ह ब्रँड वापरून फसवणूक करत आहेत.

1. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक:

2025-26 च्या पहिल्या सहामाहीत फसवणूक 2,623 कोटी रुपयांवरून 21,367 कोटी रुपयांवर गेली. खासगी बँकांमध्ये 60% घटना घडल्या असल्या तरी सरकारी बँकांमधील ग्राहकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे. 25,667 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सरकारी बँकांमधील ग्राहकांचे झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

2. विमा क्षेत्रातील फसवणूक:

जीवन, आरोग्य, वाहन अशा सर्व प्रकारच्या पॉलिसींमध्ये ऑनलाईन स्कॅम झाल्याचे पाहायला मिळाले. तर HDFC, Kotak, Shriram अशा नावांखाली WhatsApp मेसेजद्वारे फसवणूकीचे प्रकार समोर आले आहेत.

3. गुंतवणूक क्षेत्रातील फसवणूक:

‘मोठा नफा’ दाखवणाऱ्या योजनांमध्ये सुशिक्षित लोकही मोठ्या प्रमाणात फसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.