
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राजधानी दिल्लीत अति महत्त्वाच्या व्यक्तीही सुरक्षित नाहीत. येथील ढिसाळ कायदा-सुव्यवस्थेचा फटका आज काँग्रेसच्या महिला खासदार सुधा रामकृष्णन यांना बसला. मॉर्निंग वॉकला गेल्या असताना एका चोरटय़ाने त्यांची गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे महिला खासदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धक्कादायक म्हणजे, अनेक देशांच्या दूतावासांची कार्यालये व सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या अति सुरक्षित चाणक्यपुरी भागात हा प्रकार घडला. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या काँग्रेसच्या तामीळनाडूतील खासदार सुधा रामकृष्णन या द्रमुकच्या खासदार रजती यांच्यासोबत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. पोलंडच्या दूतावासाच्या जवळून जात असताना त्यांच्या दिशेने समोरच्या बाजूने एक बाइकस्वार आला. जवळ येताच काही कळण्याच्या आत त्याने सुधा रामकृष्णन यांच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि पोबारा केला. यात रामकृष्णन यांच्या मानेला दुखापत झाली. त्यांचे कपडे फाटले. सुदैवाने स्वतःला सावरल्याने त्या पडता पडता वाचल्या.
गृहमंत्री साहेब, चेन परत मिळवून द्या!
रामकृष्णन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. ‘हाय सेक्युरिटी झोनमध्ये असे होऊ शकते या कल्पनेनेच मला धक्का बसला आहे. संबंधित यंत्रणांना आपण तातडीने आदेश देऊन चोरटय़ाच्या मुसक्या आवळा आणि माझी चेन परत मिळवून द्या, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.
























































