
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय. मात्र धोनीने एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट करताना चाहत्यांना दिलासा दिला आहे की, त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील पुढचा टप्पा काहीही असला तरी त्याचे हृदय नेहमीच सीएसकेसाठी धडधडत राहील.
धोनीने आगामी आयपीएल हंगामात खेळणार की नाही, याविषयी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तरीही त्याने एका खासगी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मी खेळत राहिलो किंवा नाही, माझं नातं सीएसकेसोबत कायमचं आहे.
धोनीशिवाय सीएसके म्हणजे काहीच नाही, असं वाक्य अनेकदा चाहत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं. आणि आता स्वतः धोनीनेही हीच भावना पुन्हा अधोरेखित केली आहे. 44 वर्षीय धोनीने स्पष्ट सांगितले की, सीएसकेसोबतचं त्याचं नातं केवळ खेळाडू म्हणून असलेल्या कारकिर्दीपुरतं मर्यादित नाही, तर ते पुढेही कायम राहील.