
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेची कडक तपासणी करावी आणि पीडितांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाची बाजू घेत याचिकाकर्त्याच्या हेतूवर संशय घेतला. एका दुर्घटनेवरून एअर इंडियाची बदनामी करू नका, अशी कडक टिप्पणी केली. एका दुर्दैवी प्रसंगानंतर प्रत्येक जण एअर इंडियाविरोधात केस दाखल करू इच्छित आहे. जर सुरक्षा नियमांमध्ये बदल पाहिजे असेल तर फक्त एअर इंडियालाच का लक्ष्य करायचे. अन्य एअरलाइन्सला का सहभागी केले नाही, असा सवाल न्यायालयाने केला.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आपल्याला सर्वांना माहीत आहे की ही दुर्दैवी घटना आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एअर इंडियाला यापद्धतीने बदनाम कराल. कोर्टाने याचिकाकर्त्याला म्हटले की असं वाटायला नको की तुम्ही कुठल्या प्रतिस्पर्धी एअरलाइन्सला सेवा देत आहात. जर तुम्हाला सुरक्षा नियमांमध्ये बदल हवा असेल तर तो सर्व एअरलाइन्ससाठी असायला हवा. फक्त एअर इंडियासाठी नाही. इतर एअरलाइन्सच्या विरोधात का नाही? जर तुम्हाला कोणत्या एअरलाइन्स विरोधात व्यक्तिगत तक्रार असेल तर त्यासाठी ग्राहक मंचात तक्रार करा.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, माझा एअर इंडियाचा व्यक्तिगत अनुभव चांगला नव्हता. त्यावर कोर्टाने उत्तर दिले की, आम्हीदेखील नियमितरीत्या प्रवास करतो. कोर्टाने सल्ला दिला की, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे हवी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करा. जर कुठल्या अधिकाऱ्याने विचार केला नाही, तर आम्ही बघू.