
>>राजेश चुरी
देवाभाऊंचे गृह खाते सुस्त असून राज्यात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षांत महिलांवरील अत्याचार, बलात्कार, हत्या, बालकांवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या गुह्यांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.
पोलीस महासंचालकांच्या वतीने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातील आकडेवारीवरून राज्यात सर्व पातळ्यांवर गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
बलात्कार परिचितांकडूनच
मागील चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जवळजवळ 99 टक्के बलात्कार ओळखीच्या आरोपींकडून झाले आहेत. 2021 झालेल्या बलात्कारांच्या गुह्यांमध्ये 98.77 टक्के आरोपी ओळखीचे होते. 2022मधील आकडेवारीनुसार 99 टक्के, 2023मध्ये 99.40 टक्के आणि 2024मध्ये गुह्यांमध्ये 99.57 टक्के आरोपी महिलेच्या ओळखीचे होते.
देशातील 28 राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी देशातील दहा राज्यांच्या क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात आठव्या क्रमांकावर आहे. क्राईम रेटनुसार राजधानी दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. दिल्लीचा क्राईम रेट तब्बल 1421.1 इतका आहे.
मे 2025मध्ये बलात्काराचे 3 हजार 506 गुन्हे दाखल झाले. मे 2024मध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या गुह्यांशी तुलना केली असता 339 गुह्यांनी वाढ झाली आहे.
महिलांवरील अत्याचारात 11.67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे 2025 अखेरपर्यंत महिला अत्याचाराचे एकूण 21 हजार 667 गुन्हे दाखल झाले. मे 2024 अखेरपर्यंत 19 हजार 402 गुन्हे दाखल झाले होते. या गुह्यांमध्ये 2 हजार 265ने वाढ झाली आहे.
विनयभंग व छेडछाडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मे 2025 अखेरपर्यंत छेडछाड व विनयंभगाचे 1 हजार 927 गुन्हे दाखल झाले. मे 2024च्या तुलनेत या गुह्यांमध्ये 316ने वाढ झाली आहे.
लहान मुले बनताहेत शिकार
लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारातही वाढ झाली आहे. राज्यात 2021मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 3 हजार 458 गुन्हे दाखल झाले 2022मध्ये 4 हजार 180, 2023मध्ये 4 हजार 594, 2024मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 4 हजार 650 गुन्हे दाखल झाले. मे 2025 अखेरपर्यंत पोक्सो अंतर्गत 1 हजार 986 गुन्हे दाखल झाले. या गुह्यांची 2024 मे अखेरपर्यंत दाखल झालेल्या गुह्यांची तुलना केल्यास पोक्सोच्या गुह्यांमध्ये 224नी वाढ झाली आहे.