आम्ही शांततेत निषेध करत आहोत, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरुच राहणार – सुप्रिया सुळे

नवी दिल्लीत मतचोरी विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून राहुल गांधी, प्रियांका गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी बळाचा वापर करत हा मोर्चा रोखल्याचा निषेध करण्यात आला. तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या खासदारांना ताब्यात घेतल्याचा निषेध करण्यात आला. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आम्ही शांततेत निषेध करत आहोत. आम्ही महात्मा गांधींना आमचे आदर्श मानतो…त्यामुळे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे नेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले आणि त्यांना संसदेत सोडण्यात आले. पोलिसांच्या या दबावाचा यावेळी निषेध करण्यात आला.