डेवाल्ड ब्रेव्हिसच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

डेवाल्ड ब्रेव्हिसच्या झंझावातापुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या. त्याने 56 चेंडूंत 125 धावांची नाबाद खेळी करत उभारलेल्या 218 धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जमलेच नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 165 धावांत आटोपला आणि दुसऱया टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 53 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीन फलंदाज 57 धावांपर्यंत टिपले, मात्र ब्रेविसने ट्रिस्टन स्टब्जच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी रचत आफ्रिकेला पुन्हा सामन्यात आणले. स्टब्ज 31 धावांवर बाद झाला, मात्र ब्रेव्हिसने 12 चौकार आणि 8 षटकारांचा घणाघात करत आफ्रिकेला द्विशतकी टप्पा गाठला. त्याने ही खेळी करताना 41 चेंडूंत शतकी टप्पा गाठण्याचा पराक्रम केला. दक्षिण आफ्रोच्या टी-20 शतकवीरांच्या यादीत तो आठवा खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला

219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक ठरली.ट्रव्हिस हेड (5), कॅमरून ग्रीन (9) आणि कर्णधार मिचेल मार्श (22) स्वस्तात बाद झाले. टीम डेविडने 24 चेंडूंत 50 धावांची वेगवान खेळी केली; पण इतरांकडून त्याला पुणाचीही साथ लाभली नाही. ग्लेन मॅक्सवेल (16), अॅलेक्स पॅरी (26) याशिवाय कुणीच मैदानात उभा राहू शकला नाही. क्वेन मफाका आणि का@र्बिन बॉश यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला 18 व्या षटकातच संपुष्टात आणले. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवारी खेळला जाईल.