भाजप आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय? हर्षवर्धन सपकाळ यांचा बोचरा सवाल

स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता १५ ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे.

कबुतरांसाठी लोढा-अदानींनी विशेष टॉवर बांधावे….

कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.

भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही.

NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

प्रदेश काँग्रेसच्या SC विभागाची बैठक…

शिव, शाहू, फुले व आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम काँग्रेसचा अनुसुचित जाती विभाग करेल. तसेच भाजपा व निवडणूक आयोग यांनी संगनमताने केलेली मतचोरी राहुलजी गांधी यांनी उघड केली आहे. हा मतचोरीच्या विरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केले जाईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश अनुसुचित जाती विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राजेंद्र पाल गौतम, महाराष्ट्र प्रदेश एसी. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.