
>> रविप्रकाश कुलकर्णी
बाबासाहेब पुरंदरे आणि गो. नि. दांडेकर यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं पुण्यस्मरण आमरण जागतं आणि तेवतं ठेवलंच, पण त्याचबरोबर आबालवृद्धांना गड, किल्ले, दुर्ग यांच्या भ्रमंतीचीही स्फूर्ती दिली. त्यांचे हे कार्य चिरस्मरणीय आहे. यासाठी दोघांनी नि:स्वार्थपणे झपाटल्याप्रमाणे काम केले. त्यातूनच गड, किल्ले, दुर्ग भ्रमण करणारी एक पिढी आणि त्यासंबंधात लेखन करणारी नवीन लेखक मंडळी तयार झाली.
गो. नि. दांडेकरांच्या लेखनाने प्रभावित होऊन एका तरुणाने लेख लिहिला ‘हृदगत एका डोंगरवेडय़ाचे’ आणि तो लेख गोनिदा यांना पाठवून दिला. दांडेकरांचे मोठेपणदेखील असे की, त्यांनी तत्काळ या लेखाची पोच देताना म्हटलं, ‘ह्रदगत एका डोंगरवेडय़ाचे वाचले. जणू माझेच मी वाचतो आहेसे वाटले.’
त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी लिहिलं, तुम्हास तो दैविकी स्पर्श झाला आहे. निसर्गाने आपले दार तुम्हासाठी किलकिले केले आहे! यावर या लिहिणाऱयाने लिहिले, ‘माझं बोट नियतीने, आप्पांच्या हाती दिलं होतं!’
लेखकु लिहिता झाला. त्यानं म्हटलं, ’नाना विषयांचा अभ्यास करताना, दुर्गांच्या, लेण्यांच्या, मंदिरांच्या वाटा हिंडताना, जे जे काही दिसलं, जे काही भावलं, जे जे काही अंतरी उतरलं… ते ते इथे शब्दात उमटलं आहे!’
हा लेखसंग्रह म्हणजे मिलिंद दत्तात्रेय पराडकरकृत ‘मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे.’ बहुतेक सगळे दुर्ग पाहून तर झालेच, पण रायगड-राजगडसारखे अद्भुत दुर्ग चारशे साडेचारशे वेळा डोळसपणे पाहिले. काळ वेळ बघितली नाही की ऋतू. या संपन्नतेतून दुर्ग विषयावर पीएच.डी. मिळवून झाली. जी गोष्ट दुर्मिळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्याचे सर्व धडे निर्धाराने कसे गिरवायचे आणि त्याला सामोरे कसे जायचे हे लेखक शिकला. त्यामुळे कवी मनाचा लेखक म्हणतो,
जे अंतराचे उठले, ते डोळिया पाहिले
मग शब्दां उतरिले, सहज…
सृष्टीचे विभ्रम सांगता सांगता ते लेखन म्हणजे गद्यकाव्य होते. या लेखात शेवटचं वाक्य आहे, ‘पावसाळा आला की म्हणूनच माझं रानभैरी मन खुळावतं अन रानात पळू पळू म्हणतं…’
या आत्मानुबंधातून लेखकाला अनुभूती मिळते, ‘मन उघडं असलं की डोंगरवाटा खूप काही समजावून सांगत असतात. तुमच्या आयुष्याशी ऋतुपांचे मेळ घालतात. अवघडल्या क्षणी पाऊल कुठे ठेवावे याची जाण करून देतात.’ हे भारावलेपण लेखकाची श्रीमंती आहे. त्यामुळे अशा आठवणींचे मोहोळ लेखकाच्या स्मृती कोशात जडलेलंआहे. प्रसंगानुरूप ते तो उघडेदेखील करतो. तो शिवछत्रपतींनी रचलेला एक अभंग सादर करतो.
नासिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी
धन्य धन्य याते गोडी, लक्ष चौर्यांशीची जोडी
मनुष्य जन्म गेल्या वारे, काय करशील बा रे
शिवराजे सांगे जना, म्या तो सोडली वासना
हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचे हे तत्त्वज्ञान. हा कर्मयोग निश्चितच परिणामकारक आहे. हे धन लेखकाला कुठून मिळाले असेल? म्हणूनच लेखक म्हणतो,
‘काल राजगडावरून तारांगण न्याहाळीत होतो.
आज रायगडावरून तारांगण न्याहाळतो आहे.
पण काल अन् आजमध्ये फरक किती?
केवळ कालपाचा एक फेरा.
हिरवी सारं जसं आहे तसंच आहे.
मात्र मी? कालचा मी अन् आजचा मी.
या दोघातला फरक मला स्पष्ट जाणवतो आहे.
अन् म्हणूनच या आनंद यात्रेचा मी कृतज्ञ आहे…!’
हाच अनुभव लेखक वेगळ्या पद्धतीने सांगताना म्हणतो, ‘मधमाशांच्या पोळ्यात एका एका माशीसाठी एक एक घर असतं. माझ्या मनाचं पोळं हे अशा अनेक आठवणींनी दाटलेले आहे. मकरंद गड, पुरंदर, लोहगड, रवळ्या जवळ्या, घोडप, त्र्यंबक, तोरणा, सज्जनगड, पन्हाळा, सिंहगड, सुधागड… आठवणींच्या पहिल्या लाटेसरशी आठवणारी ही काही नावं. देखण्या चांदरातीच्या नाना स्मृती या नावाशी जडल्या आहेत.’
तसंच एका लेखात- ही दुर्ग विद्या ज्यांच्यामुळे मिळाली त्या गुरूला म्हणजे गो. नि. दांडेकर यांना लेखकाने कृतज्ञतेने शब्दसुमनांजली वाहिलेली आहे. त्याबाबत कृतज्ञतेने म्हटले आहे, लोहाचे कनक झाले, हे एके परिसेची केले. दुर्ग, त्याच्या आसपासचा परिसर, तेथला निसर्ग लेखकाने शब्दात मांडलाच आहे. पण त्याच जोडीला लेखकाने जे रेखाचित्र काढले आहे ते पाहता वाटतं, आधी दाद कोणाला द्यायची? अशा डोळस आणि जातिवंत भटक्याकडून असेच बहुत लेखन व्हावे अशी अपेक्षा या पुस्तकांने निर्माण होते.


























































