शेल्टर होम नाही, नसबंदी हाच योग्य उपाय आहे; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

भटक्या कुत्र्यांची समस्या राजधानी दिल्लीसह देशभरात गंभीर होत आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर शेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आपल्या निर्णयात याआधीच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच शेल्टर होम हा पर्याय नसून नसबंदी हाच योग्य उपाय आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यासोबतच न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसाही बजावल्या आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी काही जागा ठेवल्या जातील. कुत्र्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खायला दिले जाईल. सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाणार नाही. निवडलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी कुत्र्यांना खायला देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यात भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना आश्रय गृहात (शेल्टर होम) ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाला आता स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, आजारी, आक्रमक आणि हिंसक कुत्र्यांना शेल्टर होममध्येच ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवले जाणार नाही. आश्रयगृहात पाठवलेल्या कुत्र्यांनाही ताबडतोब सोडले जाईल. नसबंदी आणि लसीकरणानंतर कुत्र्यांना सोडले जाईल. आश्रयगृहात पाठवलेल्या कुत्र्यांना सोडले जाईल. फक्त आजारी,आक्रमक आणि हिंसक कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवले जाईल.