
>>आशिष बनसोडे
अचानक अनोळखी व्यक्ती जवळ येऊन मोबाईल बंद झालाय अथवा रिचार्ज संपलाय असे बोलून एक कॉल करायला मोबाईल मागत असेल तर सावध व्हा, कारण काही भामटे प्रवाशांना फसविण्यासाठी रेल्वे परिसरात सापळा लावत आहेत. फोन पेद्वारे मोबाईलधारकाच्या बँक खात्यातील पैसे चुटकीसरशी वळते करून गंडा घालत आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात असे गुन्हे घडले आहेत. परराज्यात जाण्यासाठी मोठय़ा संख्येने प्रवासी एलटीटी स्थानकात येत असतात. बरेचजण तेथील स्टॉलवर खरेदी करतात आणि जीपे किंवा फोन पेद्वारे पेमेंट करतात. नेमका इथेच घात होत आहे. कारण काही भामटे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांच्या मोबाईलवर वॉच ठेवतात. पेमेंट करताना टाकलेला पिनकोड अचूक हेरतात. मग वाटेल ती कारणे सांगून संबंधिताकडे कॉल करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेतात आणि ‘पे एनिवन’द्वारे काही सेकंदांत पैसे अन्य बँक खात्यावर वळते करतात. अशाप्रकारे भामटय़ांनी दोन प्रवासी तरुणांना गंडा घातला. या दोघांच्या मोबाईलमधून 1 लाख 35 हजार वळते केले. ही रोकड आरोपी केरळ, आसाम, राजस्थान आदी राज्यातील बँकधारकांच्या खात्यात पाठवून काढून घेत असल्याचे समोर आले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांनी या प्रकरणी आयटी ऍक्टप्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
झटपट नंबर, पटकन कांड
एका बहाणा सांगून प्रवाशाचा मोबाईल घेतल्यानंतर त्याचा दुसरा साथीदार मोबाईलधारकाला बोलण्यात गुंतवतो, मग तिसरा पहिल्याला बँक खात्याचा नंबर सांगून मोबाईल घेणारा त्या जीपे क्रमांकावर पैसे वळते करतो, अशी आरोपींची मोडस ऑपरेंडी आहे.
प्रवाशांनी ऑनलाईन खरेदी करताना आपला जी पे किंवा फोन पेचा पिन कोणी बघत नाही ना याची काळजी घ्यावी. काही भामटे नेमका हाच पिन बघून प्रवाशांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. असे कोणी दिसल्यास तत्काळ पोलिसांकडे संपर्क साधावा. – प्रज्ञा जेडगे, उपायुक्त (मध्य रेल्वे)