लेख – पर्युषण पर्वाची शिकवण

<<< सुभाषचंद्र सुराणा >>>

भारतात अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने दरवर्षी साजरे होत असतात. कारण मुळातच आपली भारतभूमी ही उत्सवप्रिय भूमी आहे. भारतात अनेक धार्मिक पंथ आपापल्या रूढी-रिवाजाने, पारंपरिक पद्धतीने आपापले सण साजरे करीत असतात. त्याचप्रमाणे जैन श्वेतांबर धर्मीयांचे पर्युषण पर्व यंदा 20 ते 27 ऑगस्ट 2025 पर्यंत मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरे केले जात आहे. पर्युषण पर्व म्हणजे आत्मशुद्धी करण्याचा एकमेव प्रशिक्षण प्रकल्प होय. याद्वारे आपल्या जीवनातील अनेक पापकर्मांचा निचरा करण्यासाठी तन-मन-धनाचा त्याग करून या दिवसांतील क्रियाकर्मांच्या साधनेद्वारे मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो.

भारतातील अनेक धर्म अथवा सण त्या त्या धर्माच्या महापुरुषांच्या अलौकिक कर्तृत्वातून, योगदानातून, त्यांच्या आध्यात्मिक आणि लोकोत्तर प्रेरणेमुळे साजरे केले जातात. उदा. दसरा, दिवाळी, मकरसंक्रांती, महाशिवरात्री, रामनवमी, महावीर जयंती, बुद्धपौर्णिमा जयंती, रमजान, नाताळ इत्यादी. जैन बांधवांच्या पर्युषण पर्वात आत्मकल्याणाचे कार्य होते. आत्मकल्याण व आत्मशांतीची प्रेरणा शक्ती प्राप्त होते. स्वतःच्या आत्मबलाद्वारे कठीण तपस्या करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. पर्युषण पर्वाची आराधना करण्यासाठी भगवान महावीरांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे. पर्युषण पर्वाचा संदेश आहे की, भूतकाळातील, वर्तमानकाळातील जीवनात ज्या काही अप्रिय घटना, शत्रुत्व, भांडणतंटे विसरून, सर्वांची मनोभावनेने क्षमायाचना करून ‘क्षमा वीरस्य भूषणम’ या तत्त्वाचा स्वीकार करावा. क्षमा करा, क्षमा मागा, प्रेमपूर्वक, अंतःकरणपूर्वक क्षमा मागून बंधुत्व व मैत्रित्व मार्ग स्वीकारा. ‘अकडकर मत रहो, झुक जावो, झुकने में बडा लाभ है’ या तीन सूत्रांचा जीवनात वापर करा. आगम ग्रंथातील जीवनाचा खरोखर मार्मिक अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न चालू ठेवा.

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधुनी पाहे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. भगवान महावीर यांच्यासारख्या 24 तीर्थकरांनी स्वतःच्या आत्मशुद्धीने तसेच समता, क्षमा व संयमी जीवनाने आत्मबलाच्या जोरावर मोक्ष मार्ग मिळवून सुखी जीवनाचा मार्ग दाखविला आहे. आत्मकल्याण, अहिंसा व चरित्र जैन धर्माचा प्राण आहे, तर पर्युषण पर्व हा आत्मा आहे. आत्मशुद्धीद्वारे मोक्षप्राप्ती होते हीच पर्युषण पर्वाची शिकवण आहे.