आशिया कपमध्ये टीम इंडिया प्रायोजकाविना, ड्रीम-11ने मोडला करार; विशेष तरतुदीमुळे बीसीसीआय दंडाला मुकला

बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील तब्बल 358 कोटींचा प्रमुख प्रायोजकाचा करार वेळेआधीच संपुष्टात आला आहे. मात्र करारातील एका विशेष तरतुदीमुळे बीसीसीआय ड्रीम-11वर कोणताही दंड ठोठावू शकत नाही.

2023मध्ये तीन वर्षांसाठी झालेल्या या करारा अंतर्गत टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11चे लोगो दिसत होते. परंतु नुकत्याच मंजूर झालेल्या ऑनलाईन गेमिंग विधेयकामुळे ड्रीम-11च्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. याच कारणामुळे पंपनीने करार मोडण्याचा निर्णय घेतला.

करारातील विशेष क्लॉजनुसार जर सरकारचा एखादा नवा कायदा पंपनीच्या मुख्य व्यवसायावर परिणाम करत असेल, तर संबंधित पंपनीला कोणताही दंड न देता करारातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. ड्रीम-11ची मुख्य कमाई फँटसी स्पोर्ट्सवर आधारित असल्यामुळे हा व्यवसाय कायदेशीररीत्या प्रतिबंधित श्रेणीत गेला आणि पंपनी पूर्णपणे सुरक्षित ठरली.

बीसीसीआय अडचणीत वाढ

आशिया कप तोंडावर आला असताना क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयवर प्रायोजकाविना खेळण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठवडय़ात संघासाठी नवीन प्रायोजक शोधणे आणि त्यांच्याशी सर्व कायदेशीर करार करणे हे बीसीसीआयसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. हिंदुस्थानचा संघ याआधी अनेकदा प्रायोजकाविना उतरला असला तरी या वेळची परिस्थिती काहीशी गंभीर आहे.

ड्रीम-11ने 2023मध्ये बायजूकडून मुख्य प्रायोजकाची जबाबदारी घेतली होती. त्या वेळी या कराराची किंमत 358 कोटी होती. आता ते अचानक बाहेर पडल्याने बीसीसीआयला खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यांना अपेक्षित असलेली कराराची किंमत नव्या प्रायोजकाकडून मिळण्याची शक्यताही कमी आहे.

कोण असेल नवा प्रायोजक?

हिंदुस्थानात क्रिकेटला धर्म मानले जात असल्यामुळे अनेक मोठय़ा पंपन्या बीसीसीआयकडे धाव घेतील. सध्या टाटा, रिलायन्स, अदाणीसारखे मोठे कॉर्पोरेट घराणे तसेच नवनव्या फिनटेक पंपन्या या जागेवर दावा करू शकतात. मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेता बीसीसीआयला झटपट निर्णय घ्यावा लागणार आहे.

आता अशा पंपन्यांशी संबंध ठेवणार नाही

नवीन कायदा लागू झाल्यानंतर बीसीसीआय आणि ड्रीम-11चे संबंध अधिकृतरीत्या समाप्त झाले आहेत. भविष्यात बीसीसीआय अशा कोणत्याही संस्थेशी संबंध ठेवणार नसल्याची माहिती बीसीसीआय सचिव देवाजीत सैकिया यांनी दिली. माध्यमांच्या माहितीनुसार, ड्रीम-11चे प्रतिनिधी अलीकडेच बीसीसीआयच्या मुंबई येथील कार्यालयात भेट देऊन सीईओ हेमांग अमीन यांना लेखी स्वरूपात करार संपुष्टात आल्याचे कळवले होते. लवकरच बीसीसीआय नवीन प्रायोजकासाठी टेंडर काढण्याची शक्यता आहे.