Palghar News – बोईसर एमआयडीसीत भीषण अपघात, ट्रकच्या टायरचा स्फोट; कामगाराचा जागीच मृत्यू

बोईसर एमआयडीसी परिसरातून पुन्हा एकदा कामगार सुरक्षेची दुर्लक्ष करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विराज प्रोफाइलच्या एका प्लांटमध्ये ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला. मुजाहिद शेख असे मयत कामगाराचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा टायर जुना होता. हवा भरत असताना अचानक टायरचा स्फोट झाला आणि व्हीलवरील जड लोखंडी रिंग थेट कामगाराच्या डोक्यावर आदळली. यात तो गंभीर जखमी होऊन क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर मृतदेह बोईसर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून एकही अधिकारी रुग्णालयात पोहोचला नसल्याने मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. व्यवस्थापनाचा जबाबदार अधिकारी रुग्णालयात आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. कंपनी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अपघाताच्या ठिकाणी तसेच रुग्णालयात प्रशासनाची निष्क्रियता दिसून आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कामगार संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. एमआयडीसीसारख्या औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे असे अपघात पाहता कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.