
ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. कर्वे निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.
बाळ कर्वे यांनी नुकताच त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तीन दिवसांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळ कर्वे यांचा जन्म 25 ऑगस्ट 1939 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून 32 वर्षे नोकरी केली. नोकरीसोबत त्यांनी अभिनय क्षेत्रातही सातत्याने काम केले.
कर्वे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि मालिका विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा केदार कर्वे स्थापत्य नागरी अभियंता आणि सुकन्या प्रा. स्वाती वाघ, जावई अभिनेते मिलिंद वाघ, सून नातवंड असा परिवार आहे.