टॅरिफ मागे घेऊन हिंदुस्थानची माफी मागा! अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. हिंदुस्थानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागल्याने डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वितुष्ट आले आहे. दोन्ही देशातील संबंधही कमालीचे बिघडल्याचे दिसत असतानाच आता न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्रोफेसर आणि गृह विभागाचे माजी प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थानवर लादलेले 50 टक्के टॅरिफ ताबडतोब मागे घेऊन शून्यावर आणावे आणि हिंदुस्थानची माफी मागावी, असे आवाहन प्राईस यांनी केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एडवर्ड प्राईस यांनी हिंदुस्थानवरील टॅरिफ शून्य करण्याची मागणी केली. हिंदुस्थान-अमेरिकेतील भागीदारी 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी असून ही भागीदारी चीन-रशियामध्ये काय घडते ते ठरवेल. हिंदुस्थानची भूमिका निर्णायक असून ट्रम्प चीनशी संघर्ष करत आहेत, तर रशियाशी युद्धाबाबत वाटाघाटी करत आहेत. अशा स्थितीत हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ का लादले हे समजत नाही. हे टॅरिफ शून्य करून हिंदुस्थानची माफी मागावी, असे आवाहन एडवर्ड प्राईस यांनी केले.

रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. मात्र रशियावर कोणतेही कठोर निर्बंध लादण्यात आलेले नाही, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद