T20 World Cup – न्यूझीलंडच्या 41 वर्षीय फलंदाजाचं पुनरागमन, आईच्या देशातून मैदानात उतरणार

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज पुन्हा एकदा क्रीडा विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर तो त्याच्या मुळ नावासह सामोआ देशाकडून टी-20 वर्ल्ड कप पात्रता फेरीत मैदानात उतरणार आहे. 41 वर्षीय रॉस टेलरने 2022 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु आता तो पुन्हा एकदा नवीन देशाकडून खेळताना दिसणार आहे.

रॉस टेलरने इन्स्टाग्रामवर सामोआ देशाची जर्सी हातात घेत पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली. रॉस टेलरची आई सामोआची आहे. याचमुळे त्याला सामोआ देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर तो त्याचे मुळे नाव ‘ल्यूपेपे लॉटेरू रॉस पोटोआ लोटे टेलर’ या नावाने खेळणार आहे. “मी निवृत्तीनंतर पुनरागमन करत आहे. मला अभिमान आहे की मी सामोआकडून खेळणार आहे. हे केवळ क्रिकेटमध्ये पुनरागमन नाही तर माझी संस्कृती, वारसा, गाव आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे. मी माझा अनुभव शेअर करण्यास आणि मैदानाच्या आत आणि बाहेर योगदान देण्यास उत्सुक आहे.” असं रॉस टेलरने इन्स्टाग्रावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ross Taylor (@rossltaylor3)

रॉस टेलरने न्यूझीलंडकडून खेळताना सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 112 कसोटी, 236 वनडे आणि 102 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 19 शतके आणि 35 अर्धशतके आहेत. तसेच त्याने 44.16 च्या सरासरीने 7684 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो केन विलियम्सन नंतर दुसरा फलंदाज आहे. तसेच वनडेमध्ये त्याने 47.52 च्या सरासरीने 8602 धावा केल्या आहेत. यामध्ये 21 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने सात अर्धशतके ठोकली असून 1909 धावा केल्या आहेत.