
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीतील अखेरच्या गणेशाला 26 तासांनंतर निरोप देण्यात आला. मंडळांनी पोलिसांना दाद न देता डॉल्बीचा सर्रास वापर केला. मिरवणुकीमध्ये एकावर जीवघेणा हल्ला झाल्याचे गालबोट वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.
शनिवारी सकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवतीर्थाजवळील वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, आमदार, खासदार, माजी मंत्री, अन्य पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
दुपारपासून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींची रांग होती. दुपारी चारनंतर अनेक मंडळांचे डॉल्बीसह आगमन झाल्याचे दिसले. यानंतर मुख्य रस्त्यावर गर्दी उसळली होती. मंडळांनी गणेश विसर्जनासाठी पंचगंगा नदीस प्राधान्य दिले. तिथे तीन क्रेन होत्या. शिवाय शहापूर कबनूरमधील काही मंडळांनी शहापूर खाणीत मूर्ती विसर्जन केले. मिरवणुकीत बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड असे 600 जण तैनात होते.
युवकावर हल्ला
गणेश मिरवणूक चालू असताना मुख्य रस्त्यावर कामगार चाळजवळ सराईत गुन्हेगार अर्शदउल्ला जमादार (रा. भोने माळ, इचलकरंजी) याने निखिल नितीन घाटगे (वय 25, रा. साईनाथनगर) याच्यावर लोखंडी पाईपने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत.