पुण्यात गर्दीमुळे भक्तांचा श्वास गुदमरला; पोलिसांनाही आल्या समस्या

अलोट गर्दी, डीजेचा कर्कश आवाज आणि रंगीत धूर सोडणाऱ्या फवाऱ्यांमुळे अनेक गणेशभक्तांना श्वास गुदमरणे, रक्तदाब वाढणे, चक्कर येऊन बेशुद्ध पडणे, कान दुखणे, चेंगराचेंगरीमुळे दुखापत होणे, गुदमरणे यांसारख्या समस्यांना सामना करावा लागला. ४८ जणांना तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. बंदोबस्तासाठी तैनात ५० हून अधिक पोलिसांनाही समस्यांना सामोरे जावे लागले.

विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीलाच अलोट गर्दीमुळे काही गणेशभक्तांना चक्कर येणे, श्वास गुदमरणे यांसारख्या समस्या उद्भवल्याचे दिसून आले. यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ५२ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. याबरोबरच वादन करताना टिपरू लागल्याने काहीजण किरकोळ जखमी झाले होते. ट्रॅक्टरचे चाक पायावरून गेल्याने फॅक्टर झाल्याच्याही घटना घडल्या. आवश्यकतेनुसार काही गणेशभक्तांना शेठ ताराचंद हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासतर्फे बेलबाग चौक, अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, लक्ष्मी रोड, गोखले हॉल, एस. पी. कॉलेज चौक, पूरम चौक या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. या ठिकाणी ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार करण्यात आले. तर, ४८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. नंदकिशोर बोरसे, यांच्या नेतृत्वात १२४ डॉक्टर्स, स्वयंसेवक, वॉर्ड बॉय, नर्सेस, रुग्णवाहिका, स्पेशालिस्ट यांच्या पथकाने ही उपचारसेवा बजावली. या सेवाकार्यासाठी शेठ ताराचंद हॉस्पिटल, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, मदरहूड हॉस्पिटल, माय माउली अॅम्ब्युलन्स, ओम अॅम्बुलन्स, जीवनरक्षा अॅम्ब्युलन्स, डॉ. नितीन बोरा, डॉ. प्रीती व्हिक्टर, डॉ. कुणाल कामठे, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, डॉ. उदय झेंडे, जयवंत जानुगडे, नीलेश देसरडा, प्रमोद परदेशी, गुरुकृपा मेडिकल यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी दिली.

फिट येऊन ट्रॅक्टर चालक कोसळला
लक्ष्मी रोडवरील मिरवणूक सहभागी झालेल्या ट्रॅक्टर चालकाला फिट आल्याने तो ड्रायव्हिंग करतानाच कोसळला. त्याच्यावर त्वरित आपत्कालीन उपचार करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

महिला पोलिसाला चक्कर
लक्ष्मी रोडवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एक महिला पोलीस कर्मचारी चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी ताराचंद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी व्हिडीओ कॉल करून या महिला पोलीस कर्मचारी यांना धीर दिला.

आयएमए ‘कडूनही उपचार
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि आदर फाऊंडेशनतर्फे संजीवनी उपक्रमांतर्गत विसर्जन मिरवणुकीत टिळक रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोडवर वैद्यकीय सेवा बजावली. यात भोवळ येणे, फिट येणे, दमा, डोक्याला मार लागलेल्या गणेशभक्तांवर प्रथमोपचार करण्यात आले. यावेळी आदर फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वानंद पाटील, सचिव तन्वी केळकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे, डॉ. संजय पाटील, डॉ. घाटगे, डॉ. साबणे, डॉ. गीतांजली शर्मा यावेळी उपस्थित होते.