समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे; अनेक गाड्यांचे टायर फुटले, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

समृद्धी महामार्गावर एका धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या एकामागोमाग पंक्चर होत होत्या. अनेक गाड्यांचे टायरही फुटले. अनेकांसोबत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. अखेर लोकांनी महामार्गावर गाड्या थांबवत रस्त्याची पाहणी केली असता रस्त्यावर शेकडो खिळे ठोकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

छत्रपती संभाजीनगरजवळच्या सांगवी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान दौलताबादजवळ रस्त्यावर शेकडो खिळे ठोकले होते आणि यामुळेच वाहनांचे टायर फुटत होते. चोरीच्या उद्देशाने हे खिळे ठोकण्यात आले असावेत असा प्राथमिक अंदाज होता, मात्र महामार्गाच्या कामासाठी हे खिळे ठोकल्याचे समोर आले आहे. पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते, तर अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी बॅरिकेट्स का लावले नाहीत? असा संतप्त सवाल वाहन चालकांनी केला आहे.

दरम्यान, वाहनधारकांनी घटनास्थळाचे व्हिडीओ काढून व्हायरल केले आहेत. यात रस्त्याच्या मधोमध शेकडो खिळे ठोकल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे रस्त्याच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते आणि याबाबत कोणतीही सूचना देण्यात नव्हती किंवा सदर ठिकाणी बॅरिकेट्सही लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही आणि वाहनांचे टायर पंक्चर झाले. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.