
इस्रायलने हमास नेत्यांना लक्ष्य करतानाच कतारवर हल्ले केल्यानंतर मध्य आशियात तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल तब्बल 5 हजार 593 रुपयांवर गेल्यामुळे आगामी काळात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिलिव्हरीसाठी सर्वाधिक व्यापार होणाऱया कच्च्या तेलाचे भाव 49 रुपये किंवा 0.88 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 5,593 वर पोहोचले. 10,812 लॉटसाठी व्यापार झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाचे दर 1.18 टक्क्यांनी वाढून 63.37 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 1.17 टक्क्यांनी वाढून 67.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. मंगळवारी इस्रायलने हमासच्या मुख्य नेत्याला लक्ष्य बनवत कतारवर हल्ले केले आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप करण्यात आला आहे.
जागतिक बाजारात अस्थिरता; पेट्रोलही महागणार
मध्य आशियात तणाव वाढल्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून पेट्रोलचे दरही वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत राहिले तर पेट्रोल, डिझेल महाग होण्याची भीती असून वाहतूक, अन्नपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता आहे. मध्य आशियातील युद्धग्रस्त परिस्थितीमुळे पुरवठा साखळीही विस्कळीत होण्याची भीती आहे.