
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित अपमानाचे निमित्त करून भाजप कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ताफा 15 मिनिटे रोखला. पोलिसांना धक्काबुक्की करून काही कार्यकर्ते राहुल यांच्या ताफ्यातही घुसले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
राहुल गांधी हे त्यांच्या रायबरेली मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱयावर आहेत. दौऱयाचा आजचा त्यांचा पहिला दिवस होता. राहुल गांधी यांचा ताफा लखनऊ-प्रयागराज हायवेवरून जाणार होता. त्याच मार्गावर यूपीचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह हे कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलनाला बसले. राहुल यांच्या गाडय़ांचा ताफा येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. राहुल गांधी माफी मागा… अशी मागणी करत कार्यकर्ते राहुल यांच्या कारच्या दिशेने गेले. पोलिसांनी त्यांना कसेबसे रोखले. त्यावेळी जोरदार झटापट झाली. बराच वेळ हा राडा सुरू होता. पोलिसांनी समजावल्यानंतर अखेर कार्यकर्ते निघून गेले व राहुल यांचा मार्ग मोकळा झाला.
पोलिसांनी आंदोलन होऊच कसे दिले?
राहुल गांधी यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. असे असतानाही थेट एखाद्या सरकारचा राज्यमंत्री कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन कसे करू शकतो? पोलिसांनी त्यांना परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे