कर्जत यार्डच्या कामासाठी मध्य रेल्वेवर सलग दोन दिवस ब्लॉक

कर्जत यार्ड रीमॉडेलिंग संबंधित पूर्वतयारीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 1.50 या वेळेत हा ब्लॉक असेल. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मेल-एक्स्प्रेस पुण्यात थांबवून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वीकेण्डच्या आधीही प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेची लोकल सेवा गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे विस्कळीत होत आहे. त्यात रविवारच्या मेगाब्लॉकचा ताप ठरलेला असतो. या सर्व त्रासाला प्रवासी वैतागलेले आहेत. अशातच मध्य रेल्वेने गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस विशेष ट्रफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. ठाकूरवाडी केबिन (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) यादरम्यान मध्य मार्गिकेवर तसेच नागनाथ केबिन (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) यादरम्यान अप मार्गिकेवर ब्लॉक असेल.