
गेल्या दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये पाय ठेवण्यासाठी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळाला आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी मोदी मणिपूरला जाणार असून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी चुराचांदपूरमधील पीस ग्राऊडवर सभा घेणार आहे. या सभा स्थळाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोदींचा दौरा अवघ्या काही तासांवर आलेला असताना सभा स्थळाजवळ प्रतिकात्मक शवपेट्या दिसल्याने वाद निर्माण झाला आहे.
कुकी आणि मैतेई गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला. या संघर्षात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुकी गटाने ‘वॉल ऑफ रिमेम्बरन्स’ सोबत शवपेट्या बसवल्या होत्या. या शवपेट्या जुलै ते ऑगस्ट या काळामध्ये हटवण्यात आल्या होत्या. मात्र मोदींच्या दौऱ्याच्या काही दिवस आधी या शवपेट्या पुन्हा बसवण्यात आल्याने खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या शवपेट्या हटवल्या आहेत.
एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, एक महिन्यापूर्वी या भागात लावण्यात आलेल्या प्रतिकात्मक शवपेट्या हटवण्यात आलेल्या होत्या. मात्र सभा स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या शवपेट्या पुन्हा लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या आता हटवण्यात आल्या आहेत. काही गट या शवपेट्या तिथे ठेवण्यास आग्रही असले तरी याबाबत जिल्हा दंडाधिकारी, सुरक्षा दल आणि कुकी गटांमध्ये चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुराचांदपूर येथील पीस ग्राऊंडवर सभा घेणार आहे. त्यानंतर ते राजधानी इंफाळमधील कांगला पोर्ट येथील एका कार्यक्रमात सहभागी होतील. मोदींच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. चुराचांदपूर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून या भागात ड्रोन उटवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच येथे हेलिपॅडही उभारण्यात आले असून प्रमुख रस्त्यांची दुरूस्तीही सुरू आहे.
आम्ही आनंदानं कसं नाचू?
चुराचांदपूर जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांनी मोदींच्या नियोजित दौऱ्यावर भाष्य केले आहे. आम्ही अजूनही शोकसागरात बुडालेलो आहोत. आमचे अश्रू अजूनही सुकलेले नाहीत. आमच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. मग आम्ही मोदींच्या स्वागताला आनंदाने कसे नाचू? असा सवाल त्यांनी केला. अर्थात मोदींच्या दौऱ्याचे त्यांनी स्वागत केले, पण भरल्या डोळ्यांनी आम्ही नाचू शकत नाही, असेही ते म्हणाले.