आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले

जम्मू कश्मीरमधील आम आदमी पार्टीचे आमदार मेहराज मलिक हे त्यांच्या डोडा मतदारसंघात हॉस्पिटल उभारण्यात यावे यासाठी आंदोलन करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पीएसए अंतर्गत अटक करण्यात आली. त्या विरोधात आपकडून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आप खासदार संजय सिंह जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले होते मात्र तेथे त्यांना शासकीय विश्रामगृहात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

संजय सिंह यांनी एक पोस्ट व व्हिडीओ शेअर करत आपल्याला हाऊस अरेस्ट केल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय सिंह हे या विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद करण्यात आले. तसेच त्यांना पत्रकार परिषदही घेऊ दिली नाही.

त्यानंतर संजय सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या मी श्रीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये आहे. मला हाऊस अरेस्टकरून ठेवले आहे. मला सांगितलेले देखील नाही की मला हाऊस अरेस्ट का केले आहे. मला पत्रकार परिषदही नाही घेऊ देत आहेत. आपचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेबाबत सरकारला काही प्रश्न विचारायचे होते. त्यांच्या अटके विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मला भेट द्याची होती. पण मला जाऊ दिले नाही. या राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला मला भेटायला आलेले त्यांना देखील मला भेटू दिले नाही. भाजपकडून, पंतप्रधानांकडून आपला टार्गेट केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तुमच्या या कारवायांनी आम्ही थांबणार नाही. लोकशाहीत आमची जबाबदारी आहे की जनतेचे प्रश्न मांडायचे आणि त्यासाठी आवाज उठवायचा. आमच्या आमदाराने रुग्णालयासाठी आंदोलन केले. त्याला तुम्ही अटक केली. आता हा मुद्दा संपूर्ण पक्ष उचलणारच . त्यामुळे आम्ही इथे आलोय. तसेच जी काही लढाई लढायची असेल मग ती रस्त्यापासून संसदेपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत असू दे आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे संजय सिंह म्हणाले.