जाऊ शब्दांच्या गावा – अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?

>> साधना गोरे n [email protected]

सध्या समाजमाध्यमांचं जग आहे. या माध्यमांवर विविध भावभावना व्यक्त करण्यासाठी तरुणाई अनेक प्रकारची चिन्हं वापरते. हसू, रडू, राग, प्रेम, संभ्रम इ. विविध भाव इमोजीच्या सहाय्याने व्यक्त केले जातात. माणसांना असलेलं अशा चिन्हाचं आकर्षण हे काही आजचं नाही, ते फार आदिम आहे. अनेक प्राचीन संस्कृतीतील अवशेषांवरून आणि गुहा-लेण्यांमध्ये आढळणाऱया कितीतरी चित्रशिल्पांवरून हे लक्षात येतं.

उभा अंगठा, उलटा अंगठा या चिन्हांना समाजमाध्यमांवर विशिष्ट अर्थ आहे. या चिन्हांचा पाश्चात्य देशांतील अर्थ समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे आता जगभर रूढ झाला आहे. छान, मस्त, आवडलं किंवा मान्य आहे या अर्थाने आज आपण उभ्या अंगठय़ाचं चिन्ह वापरतो; तर आवडलं नाही, मान्य नाही इ. भावना व्यक्त करताना उलटा अंगठा उमटवला जातो.

‘अंगठा’ शब्द संस्कृतमधील ‘अंगुष्ठ’ या संस्कृत शब्दांवरून मराठीत आला. पालीमध्ये हे रूप ‘अंङगुट्ठ’ आहे. तर फारसीमध्ये ‘अंगस्त’, लमाणीत ‘अंगुश्त’, सिंहलीमध्ये ‘अंगुट’, गुजराती व सिंधी या भाषांमध्ये ‘अंगूठो’ आणि हिंदीमध्ये ‘अंगूठा’ अशी रूपं आहेत.

आपल्या शरीरातला अंगठा हा एवढासा अवयव, पण धार्मिक विधीत त्याचं महत्त्व ते किती आणि त्यावरून कित्येक शब्दप्रयोगही तयार झाले आहेत. उदा. ‘त्याने साहेबांकडे रजा मागितली, पण साहेबांनी अंगठा दाखवला’ या वाक्याचा अर्थ समाजमाध्यमांवर वापरल्या जाणाऱया अंगठय़ाच्या चिन्हाशी लावायचा तर तो उलटय़ा अंगठय़ाशी लावावा लागेल. कारण या वाक्याचा अर्थ होतो, साहेबांनी रजा मान्य केली नाही. या संदर्भात कृ. पां. कुलकर्णी आणि दाते-कर्वे यांनी म्हटले आहे की, ‘पितरांना उदक (पाणी) देताना वाकडा हात करून अंगठय़ावरून पाणी सोडतात. त्यावरून अंगठा दाखवणे म्हणजे नाही म्हणणे, नकार देणे असा अर्थ रूढ झाला.’ फसविणे, ठकविणे, आधी आशा दाखवून शेवटी धोका देणे या अर्थानेही हा शब्दप्रयोग वापरला जातो.

पूर्वी शाळेत शिक्षक मुलांना अंगठे धरण्याची शिक्षा देत असत. त्यावरून ‘अंगठे धरणे’ हा वाक्प्रचारच तयार झाला. या शिक्षेत ओणवे होऊन हाताच्या बोटांनी पायाचे अंगठे धरावे लागत. पायाचे अंगठे मुखात धरणे असाही एक शिक्षेचा प्रकार अस्तित्वात असल्याचं ‘वाक्संप्रदाय कोशा’त म्हटलं आहे. शिक्षेचा हा प्रकार म्हणजे योगासनच झाले! तशीही योगासने ही शिक्षेपेक्षा कमी नव्हेत. अशिक्षित व्यक्तीला ‘अंगठाछाप’ म्हटलं जातं, कारण तो सही करू शकत नाही. त्याला सगळीकडे निळ्या शाईतला अंगठा उमटवावा लागतो.

‘अंगठय़ाची आग मस्तकात जाणे’ हा शब्दप्रयोग खूप वापरला जातो. कधी अंगठय़ाऐवजी ‘तळपाय’ म्हटलं जातं. अंगठा काय किंवा तळपाय काय; हे दोन्हीही आपल्या शरीराचे टोकाचे अवयव आहेत. रागाने नखशिखांत लाल होणं, सगळं शरीर रागाने थरथरणं या अर्थाने हा शब्दप्रयोग केला जातो.

संकटांची नुकती कुठं सुरुवात झाली आहे, अजून मुख्य संकट बरंच दूर आहे, हे सांगण्यासाठी ‘अंगठय़ास आग लागणे’ हा वाक्प्रचार वापरला जातो. हिंदू धर्मात प्रेताला अग्नी देताना पहिल्यांदा पायाकडून अग्नी देतात. संपूर्ण प्रेत जळायला बराच अवकाश लागतो. यावरून संकटाला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्याचे परिणाम व्हायला वेळ आहे असा अर्थ या शब्दप्रयोगातून व्यक्त होतो.

आपल्या अवयवांमध्ये पायाचा अंगठा आणि बोटे हे फारच लहान अवयव आहेत. अंगठा किंवा बोट सुजून मोठे झाले तरी त्यांच्या वाढीला मर्यादा असतात. अंगठा सुजून डोंगराएवढा होऊ शकत नाही. एखाद्या वस्तूला किंवा माणसाला काही कारणाने महत्त्व प्राप्त झाले तरी त्याला काही मर्यादा असते. त्याच्याहून अतिशय मोठय़ा माणसाशी तो कधीही बरोबरी करू शकत नाही, या अर्थाने ‘अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?’ असं म्हटलं जातं. या म्हणीचे ‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही’ या म्हणीशी साधर्म्य आहे.

‘राईचा पर्वत करणे’ या वाक्प्रचाराशी साम्य असणारा दुसरा वाक्प्रचार म्हणजे ‘अंगठय़ावरून दशासूर निर्माण करणे.’ या वाक्प्रचाराची अशी कथा सांगतात, सीतेने इतके दिवस रावणाच्या बंदिवासात असूनही त्याला सबंध पाहिले नव्हते. फक्त त्याचा अंगठाच तिला दिसला. कैकेयीने तो अंगठा तिला काढायला सांगून त्यावरून सबंध रावणाचे चित्र तयार केले.