
परदेशात बसून हिंदुस्थानात ड्रगची तस्करी करणाऱ्या माफियांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने दणका दिला. एनसीबीने कारवाई करून 10.07 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. जानेवारी महिन्यात ड्रग तस्करीप्रकरणी एनसीबीने गुन्हा नोंद केला होता. एनसीबीने कारवाई करून 11.540 किलो कोकेन, 4.9 किलो आणि 5.5 किलो गांजा जप्त केला होता. ड्रग तस्करीप्रकरणी मुख्य सूत्रधारासह नऊ जणांना अटक करण्यात आली होती. थायलंडमधील या मुख्य सूत्रधाराने ते कोकेन मुंबईत पाठवले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला मलेशियातून हद्दपार करून त्याला अटक करण्यात आली. या गुह्यांत बेकायदेशीर हवाला ऑपरेटर, वाहतूकदार, वितरक, पेडलर आणि इतर प्रमुख सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.