
सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असलेल्या डोंबिवली शहरात घरांची किंमत आता मुंबईएवढी झाली आहे. कल्याण-शीळ फाटा रोडवरील पलावा सिटी या उच्चभ्रूंच्या वसाहतीमध्ये दोन आलिशान पेंटहाऊस 16 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. 9 हजार 500 स्क्वेअर फूट असे पेंटहाऊसचे क्षेत्रफळ असून एका स्क्वेअर फुटामागे 16 हजार 400 रुपये मोजावे लागले. डोंबिवलीतील रिअर इस्टेटला सुगीचे दिवस आले असून हा सर्वोच्च दर असल्याचे सांगण्यात येते.
हे दोन पेंटहाऊस हँगिंग गार्डन इमारतीच्या 35व्या मजल्यावर आहेत. तेथे 10 गाडय़ांचे पार्किंग उपलब्ध करून दिले असून विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी 54 लाख 6 हजार रुपये मुद्रांक शुल्क तर 60 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. गेल्या वर्षी येथे दोन फ्लॅट सात कोटींना विकले गेले होते.