
उरण नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या १० प्रभागांच्या रचनेवर एकही हरकत घेण्यात आली नाही. त्यामुळे ही प्रारूप प्रभाग रचना आता अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. या निवडणुकीतून नगर परिषदेमध्ये २१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. पूर्वी नगरसेवकांची संख्या १८ होती. आता ती लोकसंख्येच्या तुलनेत तीनने वाढवण्यात आली आहे.
उरण नगर परिषदेचा कारभार मागील तीन वर्षांपासून प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अंतिम प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याआधी १७ हजारांहून अधिक मतदारांची संख्या असलेल्या उरणमध्ये नऊ प्रभागातून १८ सदस्य व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जात होती. आता नवीन प्रभाग रचनेनंतर प्रभागाची संख्या नऊवरून दहा झाली आहे, तर सदस्य संख्या नगराध्यक्ष वगळून तीनने वाढली असून २१ पर्यंत पोहोचली आहे.
प्रस्ताव शासनाकडे पाठवला
प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर प्रशासनाने हरकती व तक्रारी दाखल करण्याच्या सूचना नागरिकांना केल्या होत्या. मात्र मुदतीत राजकीय पक्ष, पुढारी नेते, मतदार व एकाही नागरिकांकडून हरकत, तक्रारीची नोंद झालेली नाही. यामुळे उरण नगर परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.