अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार

मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पंतप्रधान मोदींनी या हिंसाचारानंतर अनेक महिने त्यावर मौन बाळगलं होतं. गेल्या दोन वर्षातमोदी अनेकदा परदेश दौऱ्यावर गेले मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी एकदाही मणिपूरला भेट दिलेली नाही. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती. अखेर आता दोन वर्षांनी पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ मिळाला असून उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत.

मणिपूरमध्ये 2023 पासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक महिने चाललेल्या या हिंसाचारात अनेक महिलांवर बलात्कार झाले, अनेकांच्या हत्या झाल्या. दोन वर्षाहून अधिक काळापासून मणिपूर धगधगत आहे.

मणिपूरमधल्या 8500 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये येणार आहेत. मणिपूरचे मुख्य सचिव पुनित कुमार यांनी ही माहिती दिली. सर्वात आधी ते मणिपूरमधील चुरंचदपूर येथे जाणार आहेत. तेथे ते 7300 कोटींच्या विविध कामांचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर राजधानी इंफाळमधील 1200 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत.