
>> दिलीप ठाकूर
कधी कधी अचानक एखादी धक्कादायक बातमी येते आणि आयुष्य कसे व किती बेभरवशाचे आहे याची कल्पना देते. असेच 5 सप्टेंबर रोजी अभिनेता आशीष वारंग यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी समजल्यावर झाले. निधनसमयी त्यांचे वय पंचावन्न वर्षे इतके होते. एकाच वेळेस मराठी, हिंदी तसेच काही कन्नड व तेलुगू भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारत असलेला हा कलाकार अतिशय मितभाषी. आपले काम भले नि आपण भले या वृत्तीचा. म्हणून तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांसोबत जाहिरात, चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करताना त्या कलाकारांनीही आशीष वारंग यांच्या सोबत छायाचित्र वा सेल्फी काढण्यात अजिबात संकोच बाळगला नाही.
आशीष वारंग हे भारतीय हवाई दलात कार्यरत होते. देशसेवा केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकून आपले नशीब आजमावले. आशीष वारंग यांचे बालपण अतिशय खडतर होते. त्यांच्या आईने एकटीने दोन्ही मुलांचे पालनपोषण केले आणि जिद्दीने हवाई दलात देशसेवेसाठी पाठवले. लहानपणापासूनच आशीष वारंग यांना चित्रपट पाहायची आवड होती. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही खिशात दोन रुपये असले तर एक रुपयात ते सिनेमा बघायचे. त्यामुळे ते आईचा खूप मार खायचे. हवाई दलात रुजू झाल्यानंतरही ते आवड म्हणून नाटकांतून काम करत, पण लग्नानंतर मात्र त्यांनी देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिले. 2010 नंतर सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर आशीष वारंग यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचे ठरवले. हा निर्णय अतिशय धाडसी होता. चित्रपटांतून कामे मिळवणे सोपे नसते. अनेक प्रकारची आव्हाने असतात. निर्माता व दिग्दर्शकांकडून ‘भेटत रहा’ ( मिलते रहो) अशी आश्वासने ऐकत ऐकत संयम राखावा लागतो. महाजन फिल्म्स निर्मित व ज्ञानेश्वर आंगणे दिग्दर्शित ‘सासूबाई गेल्या चोरीला’ ( 2013) हा त्यांनी भूमिका साकारलेला पहिला चित्रपट. त्यातूनच छोटय़ा छोटय़ा भूमिका करत असताना रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशम’, ‘सर्कस’ अशा अनेक चित्रपटांत ते खाकी वर्दीच्या वेशभूषेत दिसले. ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर आशीष तांबे अतिशय लक्षवेधक ठरला. त्यांनी ‘दृश्यम’, ‘सिम्बा’, ‘मवाली’, ‘सर्कस’, ‘मर्दानी’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ अशा हिंदीसह ‘नाद’, ‘आठवा रंग प्रेमाचा’,‘अप्सरा’, ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘तांडव’ इत्यादी मराठी चित्रपट, ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज यात भूमिका केल्या. संजय निरंजन दिग्दर्शित ‘बॉम्बे’ ही त्यांनी भूमिका साकारलेली शेवटची कलाकृती. आशीष वारंग यांनी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आमीर खान, कतरिना पैफ इत्यादींसोबत जाहिरातपटांतही काम करून आपले अनुभव विश्व विस्तृत केले.
गेल्याच वर्षी त्यांचा मुलगा रोहन हा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला होता. मुलाने शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. या संसारात त्यांना पत्नीचीही मोठी साथ मिळाली. संसार व कारकीर्द यांचा व्यवस्थित समतोल साधण्यात यश लाभले असतानाच आशीष वारंग यांना काही महिन्यांपूर्वी कावीळ होणे आणि त्यातून ते बाहेर पडत असतानाच मृत्यूने गाठले हे दुर्दैव!