वेब न्यूज – हिंदुस्थानची पहिली रेल्वे

>> स्पायडरमॅन

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या येणाऱया प्रकल्पाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ह्या प्रकल्पासाठी येणारा खर्च, ह्या रेल्वेचे डिझाइन, तिकिटाचे दर, तिचा वेग, प्रकल्पाचे फायदे तोटे याबद्दल खऱया खोटय़ा माहितीची जोरदार देवाण घेवाण सुरू आहे. मात्र आपल्या देशातील पहिली रेल्वे देखील मुंबईपासून धावली होती याबद्दल अनेकांना कल्पना नाही असे दिसते. 1853 साली 16 एप्रिल रोजी बोरीबंदर अर्थात सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते ठाणे अशी ही पहिली रेल्वे धावली होती. दुपारी 3.35 वाजता निघालेली ही गाडी साधारण 35 किलोमीटरचा प्रवास करून 4.45 वाजता ठाण्याला पोहोचली.

16 एप्रिल 1853 रोजी तत्कालीन बोरीबंदर स्टेशनला मोठय़ा प्रमाणावर सजवण्यात आले होते. वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे झेंडे सर्वत्र फडकत होते. स्टेशनवर ब्रिटिश अधिकाऱयांची आणि हिंदुस्थानातील मान्यवर लोकांची मोठी गर्दी जमली होती. 13 डबे जोडलेल्या या गाडीतून साधारण 400 लोकांनी त्या दिवशी प्रवासाचा आनंद घेतला. या गाडीला सिंध, साहेब आणि सुलतान अशी 3 इंजिन्स जोडण्यात आलेली होती. त्या काळात या गाडीच्या फर्स्टक्लास तिकिटाचा दर 2 रु. 10 आणे, सेपंड क्लास साठी 1 रु. 1 आणा आणि थर्ड क्लाससाठी 5 आणे 3 पैसे असा ठेवण्यात आला होता.

हिंदुस्थानात रेल्वे सुरू करण्याचे श्रेय तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसी याच्या जोडीने व्यापारी जमशेदजी जिजाभॉय आणि नाना शंकरशेठ यांना दिले जाते. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशाचे दोन तुकडे पडले होते आणि त्या काळी नव्याने निर्माण झालेला रेल्वेचा 40 टक्के हिस्सा हा पाकिस्तानच्या वाटय़ाला गेला होता. मात्र 1950-51 सालात रेल्वेच्या सेवेवर विशेष लक्ष पेंद्रित करण्यात आले आणि पुन्हा एकदा जोमाने रेल्वे सेवेची पुनर्बांधणी करण्यात आली. 1976 साली हिंदुस्थानातील अमृतसर ते पाकिस्तानातील लाहोर अशी पहिली समझोता रेल्वे सुरू झाली.